जिल्हा

नवी मुंबई क्लस्टरवरून महायुतीत वाद उफाळला

नवी मुंबई क्लस्टरवरून महायुतीत वाद उफाळला
नवी मुंबई क्लस्टरवरून महायुतीत वाद उफाळला फोटो: ठाणे वैभव
एकनाथ शिंदे- गणेश नाईक आमनेसामने

नवी मुंबई: नगरविकास विभागाचे मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी घणसोलीत येत सिम्प्लेक्स सोसायटीच्या क्लस्टर विकासाला पाठिंबा दर्शविला. ‘क्लस्टरला जन्म एकनाथ शिंदेंनी दिला,’ असे सांगतानाच छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठी घरे मिळाली पाहिजेत, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. त्यामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

घणसोली सेक्टर-७ येथे सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘नवी मुंबई दहीकाला उत्सव २०२६’मध्ये शिंदे बोलत होते. दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकांचे कौतुक केल्यानंतर त्यांनी घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला. घर हे प्रत्येकाचे स्वप्न असल्याचे सांगत नागरिकांना मोठी आणि प्रशस्त घरे मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. घरांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. ठाण्यात क्लस्टरच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना हक्काची घरे मिळाल्याचा दाखला देत नवी मुंबईतील रहिवाशांनाही पुनर्विकासातून चांगली घरे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सिम्प्लेक्स क्लस्टरच्या पुनर्विकासाची प्रक्रिया महापालिकेने यापूर्वीच सुरू केली आहे. १७ जून रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सिम्प्लेक्स हाऊसिंग कंडोमिनियमसाठी नागरी पुनरुत्थान आराखडा अधिसूचित करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १४ जुलै २०२६ रोजी क्लस्टर क्रमांक चारसाठी नागरी पुनरुत्थान आराखड्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. या आराखड्यात सेक्टर-७मधील सिम्प्लेक्स हाऊसिंग कंडोमिनियमचा सुमारे ६७ हजार १४६ चौ.मी. क्षेत्राचा समावेश असून नागरिकांकडून ३० दिवसांत सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या.

मात्र, क्लस्टर योजनेतील वाढीव एफएसआयबाबत गणेश नाईक यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. वाढीव बांधकामामुळे नवी मुंबईतील पाणीपुरवठा, वाहतूक, पार्किंग, मलनिस्सारण आणि अन्य पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. वाढीव एफएसआयच्या परिणामांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची मागणीही महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली असून, अभ्यास पूर्ण होईपर्यंत क्लस्टर योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.

त्यामुळे सिम्प्लेक्समधील रहिवाशांना मोठे घर देण्याचा शिंदेंचा आग्रह आणि वाढीव एफएसआयच्या परिणामांबाबत नाईकांनी उपस्थित केलेले प्रश्न, यामुळे क्लस्टरचा मुद्दा आता केवळ पुनर्विकासापुरता मर्यादित न राहता महायुतीतील शिंदे-नाईक संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475